पुणे: उरुळी कांचन येथील बहुउद्देशीय सामाजिक संघटनेचे अध्यक्ष अनिल रामू कदम यांच्या वतीने टिळेकर मळा जिल्हा परिषद शाळेत १० डिसेंबर २०२५ रोजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. पेन, पेन्सिल, पाट्या, बिस्किटे यांसह विविध साहित्याचे विद्यार्थ्यांमध्ये वितरण करण्यात आले. अनिल कदम यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसला.
या कार्यक्रमास आश्विनी रूपक गवते (सरपंच, तरडे), राजेंद्र बाळासाहेब टिळेकर (सदस्य, उरुळी कांचन ग्रामपंचायत), सुनिल तांबे (ग्रामपंचायत सदस्य, उरुळी कांचन), राहुल बिरा मदने (शाळा समिती अध्यक्ष), सुनिल तुपे (भा. हवेली तालुका सरचिटणीस) तसेच आबा चहाण (झोपडपट्टी सुरक्षा दल) यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात बोलताना मा. महंत श्री. गोपालमास कपाटे महानुभाव यांनी जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व अधोरेखित केले. “अनेक राष्ट्रनायक, संत आणि मान्यवर व्यक्तींनी शिक्षणाची पायाभरणी अशाच शाळांतून केली आहे. शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी सातत्याने पुढाकार घेत राहणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
माजी विद्यार्थिनी सुवर्णा कांचन यांनी शाळेतील आठवणींना उजाळा देत सांगितले, “शाळेत मराठी सुविचार चुकीचा लिहिल्याने मिळालेली शिक्षा माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली आणि त्यातूनच पत्रकार बनण्याची दिशा मिळाली.”
मुख्याध्यापक मा. राजाराम मोरे यांनी सूत्रसंचालन करताना अनिल कदम यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. “शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल अधिक उत्साह निर्माण होईल,” असे ते म्हणाले.
या उपक्रमाबद्दल स्थानिक नागरिकांकडूनही अनिल कदम यांच्या कार्याचे प्रशंसा करण्यात येत आहे.
