पुणे : अष्टापूर (ता. हवेली) येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान संचलित न्यू इंग्लिश स्कूल येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा व नवनिर्वाचित जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती सदस्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. यंदा शाळेतील तब्बल १२३ विद्यार्थी एसएससी परीक्षेला सामोरे जात असून, निरोप समारंभात भावनिक वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमात विद्यार्थिनींनी पारंपरिक साड्या परिधान केल्या होत्या, तर विद्यार्थ्यांनी पांढरा शर्ट व पॅन्ट असा गणवेश परिधान करून शिस्तबद्ध उपस्थिती लावली. शाळेचा निरोप घेताना अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी भावुक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

प्रमुख पाहुणे व आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदरचे सचिव शांताराम पोमण यांनी अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा गौरव केला. “गेल्या अनेक वर्षांपासून दहावीचा निकाल शंभर टक्के लागतो; ही उज्ज्वल परंपरा यंदाही कायम राहील,” असा विश्वास व्यक्त करत त्यांनी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे, शाळा व गावाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले.
जिल्हा परिषद सदस्य सागर शेलार व सुरेखाताई हरगुडे यांनी शिस्त, मेहनत आणि संस्कार यशाची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. पंचायत समिती सदस्य कुशल नाना सातव यांनी दहावीमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास ३१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.
उद्योगपती राजेश कोतवाल, अंकुश कोतवाल व सचिन कोतवाल यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शाळा समितीचे अध्यक्ष श्रीहरी कोतवाल व सदस्य तयाजी जगताप यांनीही मार्गदर्शन केले.

दहावीच्या विद्यार्थ्यांपैकी संस्कृती कुंजीर, सोहम जगताप, दिव्या शिंदे, साहिल चौंडकर व श्रावणी निकाळजे यांनी मनोगत व्यक्त करत शाळेतील आठवणींना उजाळा दिला. छोट्या वर्गांतील जानवी शिंदे, श्रावणी सावंत, जय कोतवाल व आराध्या कोतवाल यांनी शुभेच्छा संदेश सादर केले.
कार्यक्रमास नियामक मंडळाचे सदस्य रमेश कोतवाल, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक शामराव कोतवाल, शाळा समिती सदस्य नितीन मेमाणे, विजय कोतवाल, माजी सरपंच दत्तात्रय कटके, सोमनाथ कोतवाल, अष्टापूर व्हॉइसचे चेअरमन सुरेश दत्तू कोतवाल, भैरवनाथ प्रसादिक दिंडीचे माजी अध्यक्ष शामराव वारे, उद्योगपती संतोष कोतवाल, नाना कोतवाल, दीपक कोतवाल, दिवाकर पिंगळे, रामदास कोतवाल, नामदेव कोतवाल, तुकाराम कोतवाल, शिवाजी राजे कोतवाल, सुनिता कुंजीर, देविदास कोतवाल, ओमकार हरगुडे, साहिल देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक मुख्याध्यापक सुभाष काळे यांनी केले. सहशिक्षक बाळासाहेब ढवळे यांनी सूत्रसंचालन केले, तर कल्पना तांबे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.