पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपाचे ज्येष्ठ नेते धनराज आसवानी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन आसवानी यांचे स्वागत केले. यावेळी माजी उपमहापौर डब्बू आसवानी उपस्थित होते.

धनराज आसवानी हे भाजपाचे माजी शहर उपाध्यक्ष असून त्यांनी दिवंगत आमदार व भाजप शहर अध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या सोबत ही जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या पत्नी सविता धनराज आसवानी या २०१२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर वॉर्ड क्रमांक १९ मधून ३ हजारांहून अधिक मतांनी निवडून आल्या होत्या. २०१७ मध्ये धनराज आसवानी यांनी याच वॉर्डमधून भाजपाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली होती.

सिंधी समाजासह प्रभाग क्रमांक १९ मधील नागरिकांशी आसवानी यांचा निकटचा संपर्क आहे. २००५–०६ या कालावधीत त्यांनी सेवा विकास बँकेचे अध्यक्षपद भूषविले असून त्यांच्या कार्यकाळात बँकेचा ‘एनपीए’ शून्य टक्क्यांवर आणण्यात यश मिळवले होते. सध्या ते पिंपरी मर्चंट फेडरेशनचे संस्थापक उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या जिजामाता रुग्णालयाचे नूतनीकरण, साधू वासवानी उद्यान, जयहिंद हायस्कूल व मिलिंदनगर स्मशानभूमीचे नूतनीकरण केले आहे. तसेच पिंपरी कॅम्प परिसरातील उच्चदाब वीजवाहिन्या काढून भूमिगत केबल टाकणे, झोपडपट्ट्यांमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहे व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे. पवना नदीवरील झुलेलाल घाटावर गणपती विसर्जन कुंड उभारणे व घाटाचे डांबरीकरणही त्यांच्या कार्यात समाविष्ट आहे.

कोविड काळात संजय गांधी नगर, मिलिंदनगर व रिव्हर रोड परिसरातील नागरिकांना ब्लँकेट व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांनी मदतीचा हात दिला. धनराज आसवानी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक १९ मधील पक्षाची संघटनात्मक ताकद वाढल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *