पुणे : कौटुंबिक वादातून पोलिसांत तक्रार दिल्याचा राग मनात धरून पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना हडपसरमधील महंमदवाडी परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
अनिल पंढरीनाथ माने (वय ४२, रा. साठेनगर, तरवडे वस्ती, महंमदवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत त्याची पत्नी जया माने (वय ३५) हिने काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल आणि जयामध्ये कौटुंबिक कारणावरून वारंवार वाद होत होते. यापूर्वी जयाने पोलिसांकडे तक्रार दिली होती. सोमवारी (ता. २२) सायंकाळी सुमारे सहाच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. या वादातून अनिलने पत्नीचा दोरीने गळा आवळत तिच्यावर हल्ला केला, तसेच डोक्यात गजाने मारहाण केली.
या हल्ल्यात जया गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विनायक गुरव करत आहेत.
