पुणे: शेवाळवाडी उपबाजारात शेतकऱ्यांची लूट थांबण्याचे नाव घेत नसल्याने नाराजीचा सूर चढू लागला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजाराम धोंडकर यांनी दोन दिवसांपूर्वी मांजरी उपबाजाराला दिलेल्या भेटीत शेतकऱ्यांकडून शंभर किलोला सरकारने ठरवलेल्या पाच रुपयांच्या दरापेक्षा अधिक वसुली केली जात असल्याची गंभीर बाब समोर आली. दर निश्चित असतानाही बाजार समितीच्या मशीनमधून जादा रकमेची पावती काढून शेतकऱ्यांना लुटण्याचे प्रकार सुरूच असल्याचे आरोप शेतकरी करत आहेत.

पालेभाज्यांच्या व्यवहारात तर अनियमिततेचे धक्कादायक चित्र दिसून आले आहे. शंभर गड्डीला १ रुपये १० पैसे असा अधिकृत दर असताना, मशीनमधून ७७ रुपये घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच ४५० गड्डीच्या मालाचा दरही चुकीचा दाखवत बाजार समितीकडून व्यापारी व शेतकरी दोघांचीही लूट होत असल्याचे उदाहरण समोर आले आहे.

मार्केट कमिटीचे सभापती जाणूनबुजून हे व्यवहार सुरू ठेवीत असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी व व्यापारी करत असून संताप वाढत आहे. बाजारातील या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, उलट त्यांची आर्थिक कोंडीच होत असल्याचे चित्र आहे.

या सर्व प्रकारावर रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत आप्पा काळभोर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची लूट थांबणार नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे. बाजार समितीतील कारभारावर तातडीने कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी संघटनेची मागणी आहे.

शेतीमाल विक्रीच्या हंगामातच सुरू असलेल्या या लुटीमुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक फटका बसत असून त्यांच्या मनात असंतोष वाढत चालला आहे. प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून या गैरव्यवहारांना आळा घालावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *