पुणे : मध्य रेल्वेच्या लोहमार्गालगत उभारण्यात आलेल्या लोखंडी कुंपणामुळे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील उगांव परिसरातील अनेक गावांमधील शेतीकडे जाणारे व दैनंदिन वापरातील रस्ते बंद झाले आहेत. याचा फटका शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकांना बसत असून, शेतीकाम, पाणीपुरवठा, माल वाहतूक तसेच शाळकरी मुलांची ये-जा गंभीरपणे प्रभावित झाली आहे.

रस्ते बंद झाल्याने काही ठिकाणी वृद्ध व आजारी नागरिकांना वेळेत उपचारासाठी पोहोचता न आल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. अनेक शेतजमिनी लोहमार्गाच्या पलीकडे असल्याने मोठा फेरा मारावा लागत असून, काही भागांत थेट मार्गच उपलब्ध नसल्याने शेतशिवार अक्षरशः कुंपणात अडकले आहे. हा प्रश्न केवळ उगांवपुरता मर्यादित नसून, रेल्वे मार्गालगतच्या जिल्ह्यातील इतर गावांतील शेतकरी व नागरिकांनाही भेडसावत आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खासदार व आमदारांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच खासदारांनी संसदेत प्रश्न उपस्थित करून रेल्वे प्रकल्पासाठी जमिनींचे अधिग्रहण कशा स्वरूपात झाले, किती मोबदला देण्यात आला आणि शेतकऱ्यांसाठी पर्यायी रस्त्यांची तरतूद आहे की नाही, याबाबत स्पष्ट उत्तरे मागावीत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, तातडीने उपाययोजना न झाल्यास उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात येईल, असा इशारा दत्तात्रेय सुडके, दीपक पानगव्हाणे, अशोक सुडके, सीताराम मापारी, गंगाधर सुडके, अकिल शेख, मनीषा मापारी, समीर शेख, शांताबाई सुडके, साजिया शेख, मंगला सुडके, पुष्पा पानगव्हाणे, शांताराम पानगव्हाणे, शोभा पानगव्हाणे आदींसह परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.
“विकास आवश्यक असला तरी तो उपजीविकेवर घाला घालणारा नसावा. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर लोहमार्गालगत सर्व्हिस रोड, भुयारी मार्ग किंवा आवश्यक ठिकाणी गेटची तातडीने व्यवस्था करावी. ब्रिटिश काळात रेल्वे प्रकल्पासाठी शेतजमिनी अधिग्रहित करण्यात आल्या; मात्र योग्य मोबदला मिळाला नाही. आता रस्त्याअभावी शेती करणे अधिकच अवघड झाले आहे.”
— दत्तात्रेय सुडके, शेतकरी