पुणे : येथील सोरतापवाडी परिसरात हुंडाबळीच्या संशयातून एका उच्चशिक्षित विवाहित अभियंता महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २४ जानेवारी रोजी घडली. या गंभीर आणि संवेदनशील प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उद्या (ता. ३१) सकाळी ११.३० वाजता उरुळी कांचन पोलिस ठाण्याला भेट देणार आहेत.

या घटनेमुळे ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डॉ. गोऱ्हे यांनी या प्रकरणाबाबत निवेदन देत तपासाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासह पुढील कारवाईबाबत पोलिस अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
हुंडा, कौटुंबिक छळ आणि महिलांवरील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तपासात कोणतीही दिरंगाई होऊ नये, तसेच पीडितेला न्याय मिळावा, यासाठी योग्य त्या सूचना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ग्रामीण भागातील महिलांच्या तक्रारी कशा स्वरूपाच्या आहेत, त्या वेळेवर नोंदवल्या जात आहेत का, समुपदेशन आणि संरक्षण यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत आहेत का, याचीही पाहणी करण्यात येणार आहे. महिलांवरील अत्याचाराच्या तक्रारी हाताळताना संवेदनशीलता ठेवणे आणि तत्काळ मदत पोहोचवणे आवश्यक असल्यावर डॉ. गोऱ्हे भर देणार आहेत.
दरम्यान, दुपारी १२ वाजता उरुळी कांचन पोलिस ठाण्यात परिसरातील महिला समुपदेशक, सामाजिक कार्यकर्त्या आणि महिला प्रतिनिधींशी संवाद साधण्यात येणार आहे. या बैठकीत ग्रामीण महिलांच्या समस्या, अडचणी आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबत चर्चा होणार असून, भविष्यात अशा दुर्दैवी घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचा निर्धार व्यक्त केला जाणार आहे.