पुणे : आगामी पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी प्रचाराची दिशा स्पष्ट करत घरोघरी जाऊन प्रचार करा, छोट्या बैठका व स्थानिक मेळाव्यांवर भर द्या, असे स्पष्ट निर्देश कार्यकर्त्यांना दिले.

प्रदेश पातळीवरील कोणताही मंत्री किंवा पदाधिकारी प्रचारासाठी येणार नसून, स्थानिक कार्यकर्त्यांनीच प्रचाराची संपूर्ण जबाबदारी घ्यावी, असेही चव्हाण यांनी ठामपणे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून झालेली विकासकामे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी बूथ पातळीवरील संघटना अधिक मजबूत करण्यावर भर दिला. भाजपची बूथ यंत्रणा सक्षम असून, त्याच माध्यमातून प्रचार अधिक प्रभावीपणे राबवावा, असे निर्देश त्यांनी दिले. संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांची मेहनत आणि विकासाच्या मुद्द्यांवर आधारित प्रचाराच्या जोरावर पक्षाला मोठे यश मिळेल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

या बैठकीस प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार राहुल कुल, भीमराव तापकीर, पुणे दक्षिण जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, माजी आमदार संजय जगताप आणि संग्राम थोपटे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीचे सूत्रसंचालन राजेश पांडे यांनी केले.
दरम्यान, बैठकीच्या सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.