पुणे : प्लॉट विक्री करून देण्याचे आमिष दाखवत टोकन रक्कम म्हणून पाच लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शेवाळवाडी येथील मांजरी ग्रीन वूड परिसरात राहणारे काळूराम बाळासाहेब लवांडे (वय ३३) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या फिर्यादीवरून सतेज चंद्रशेखर पाषाणकर (रा. धायरी, पुणे), राहुल लक्ष्मण सुतार आणि नितीन जगताप यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६ (२), ३५२, ३५१ (२) आणि ३ (५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३ फेब्रुवारी २०२३ रोजी लोणीकाळभोर गाव हद्दीतील गट क्रमांक २/२, पाषाणकर बाग (ता. हवेली, जि. पुणे) येथील जमिनीवर प्लॉटिंग करून प्लॉट विक्री करण्याचे आमिष आरोपींनी फिर्यादीस तसेच गणेश शिंदे यांना दाखवले होते. प्लॉट बुकिंगसाठी टोकन म्हणून आरोपींनी फिर्यादीकडून एकूण ५ लाख रुपये स्वीकारले.

मात्र, त्यानंतर संबंधित प्लॉटची विक्री न करता किंवा खरेदीखत करून न देता आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून आर्थिक फायद्यासाठी त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात ११ मार्च २०२६ रोजी रात्री ६.२३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुन्हा पोलिस उपायुक्त, परिमंडळ ६ यांच्या परवानगीने दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अंकुश बोराटे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *