पुणे : गणेश जयंतीचे औचित्य साधत लोहगाव येथील गवळी गणेश मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराने समाजसेवेचा आदर्श निर्माण केला. गुरुवार (दि. २२ जानेवारी २०२६) रोजी गवळी गणेश मंदिर, खेसे–पांडे आळी तसेच पुणे महापालिकेच्या लोहगाव संपर्क कार्यालयात हे शिबीर संपूर्ण दिवसभर पार पडले.

शिबिराचे उद्घाटन लोहगावच्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. श्रेयस प्रीतम खांदवे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी डॉक्टर तसेच लोकप्रतिनिधी या दोन्ही भूमिकांतून रुग्णांशी संवाद साधला. गवळी गणेश मंडळाच्या या उपक्रमामुळे नागरिकांच्या विविध आजारांचे निदान होऊन पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच प्रभागातील कोणत्याही नागरिकाला आरोग्यविषयक मदतीची आवश्यकता असल्यास त्यांनी थेट संपर्क साधावा , आपण आणि पती प्रीतम खांदवे सर्वतोपरी मदत करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

गवळी गणेश मंडळ दरवर्षी समाजोपयोगी उपक्रम राबवत असल्याचे सांगत प्रीतम खांदवे यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. त्यांच्या प्रत्येक उपक्रमात आपण सहकार्य करत आलो असून भविष्यातही ते कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
या आरोग्य शिबिरात रक्तातील सर्व घटकांची तपासणी, रक्तातील साखर तपासणी, डोळ्यांची मोतीबिंदू व काचबिंदू तपासणी, दंत तपासणी तसेच महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी अशा सुमारे १३ हजार ५०० रुपये किमतीच्या तपासण्या नागरिकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या.
या वेळी मल्हारी खांदवे, दगडूदादा खांदवे, देविदास खांदवे, दादा निंबाळकर, विकास भुकन, सतीश पांडे, गरुदेव पांडे, प्रतीक खांदवे, निलेश खेसे, चेतन पांडे, संदेश पांडे, अक्षय खेसे, गणेश काळे आदी मान्यवर उपस्थित होते.