पुणे : हवेली तालुक्यातील सहकार चळवळीचा कणा मानला जाणारा यशवंत सहकारी साखर कारखाना लि., चिंतामणीनगर (थेऊर ) अखेर तब्बल पंधरा वर्षांच्या अंधारातून बाहेर आला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ अखेर थकीत असलेले तब्बल ५४८५.२६ लाख रुपयांचे कर्ज एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत फेडत कारखान्याने ऐतिहासिक यश मिळवले आहे.
३०४४.४४ लाखांची सूट मिळवून २४४०.८२ लाख रुपये दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी भरून कारखाना राज्य बँकेच्या कर्जातून पूर्णतः मुक्त करण्यात आला.

दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी राज्य सहकारी बँकेचे प्राधिकृत अधिकारी विनायक आंगणे आणि कायदा विभागाचे व्यवस्थापक अमित डी. जोशी यांनी प्रत्यक्ष कारखाना कार्यस्थळी येत रितसर ताबा कारखाना व्यवस्थापनाकडे सुपूर्द केला. यावेळी अध्यक्ष सुभाष जगताप, उपाध्यक्ष किशोर उंद्रे, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक कैलास जरे तसेच पंच बळीराम गावडे व संजय भोरडे उपस्थित होते. तसेच सभासद शेतकरी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

संचालक मंडळाने बँक ऑफ इंडिया (थेऊर) – १.३० कोटी, स्टेट बँक ऑफ इंडिया (उरुळीकांचन) – ७.१० कोटी आणि बँक ऑफ बरोडा (कुंजीरवाडी) – ३.७५ कोटी रुपये अशी इतर बँकांची थकीत कर्जेही एकरकमी योजनेतून दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी फेडून कारखाना कर्जमुक्त केला आहे.
सन २०१०-११ पासून बंद असलेला कारखाना खऱ्या अर्थाने पुन्हा सभासद शेतकऱ्यांच्या ताब्यात आल्याने परिसरात आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी, कामगार व शासकीय देणी निकाली काढून अत्याधुनिक शुगर प्लांट, डिस्टिलरी आणि सहवीजनिर्मिती प्रकल्प सुरू करून ‘चिंतामणी यशवंत ’ला पुन्हा वैभवाच्या शिखरावर नेण्याचा निर्धार संचालक मंडळ व सभासदांनी व्यक्त केला आहे.