पुणे : “रहायला घर नाही, अभ्यासासाठी दिवाही नाही; पण जिद्द, मेहनत आणि स्वप्न मात्र होती,” या परिस्थितीत कोरोनाच्या काळात रस्त्यावरील दिव्याखाली बसून शिक्षण घेतलेल्या एका तरुणाने पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदापर्यंत मजल मारली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश मिळवणारे संतोष प्रल्हाद भोसले यांच्यासह पारधी समाजातील अन्य गुणवंत युवकांचा पुणे शहराचे पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या गौरव समारंभात कुमारी ऋतुराजाणी भास्कर भोसले (एम.ए., बी.एड.), पुणे शहर पोलिस हवालदार अनिल भोसले , अ‍ॅड. विशाल भोसले तसेच कुमार स्वप्रीत भोसले (१५ वी उत्तीर्ण) यांचा समावेश होता. अत्यंत दारिद्र्य, उपासमार आणि सामाजिक उपेक्षेचा सामना करत या युवकांनी शिक्षण व प्रामाणिक परिश्रमांच्या जोरावर आपली वाट स्वतः घडवली.

हा प्रेरणादायी कार्यक्रम आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले यांच्या पुढाकारातून पार पडला. पारधी समाजासारख्या उपेक्षित घटकातील युवक पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचतो, ही बाब समाजासाठी अभिमानास्पद असून नव्या पिढीसाठी आशेचा किरण ठरली आहे.

यावेळी बोलताना पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा म्हणाले, “देशसेवा करताना स्वतःला पूर्णपणे झोकून द्यावे लागते. समाजासाठी काम करताना माणूस जातो तेव्हा तो हसत गेला पाहिजे. संघर्षातून घडलेली माणसेच समाजाला दिशा देतात.”

याप्रसंगी अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील व अपर आयुक्त डॉ. पंकज देशमुख यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करत आदिवासी समाज मुख्य प्रवाहात यावा यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.

गरीबी, उपेक्षा आणि सामाजिक अन्यायावर मात करत कायद्याच्या मार्गाने उज्ज्वल भविष्य घडवणारी ही यशोगाथा, “परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि शिक्षण माणसाला उंचावते” हा विश्वास अधिक दृढ करणारी ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *