पुणे : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने येथील महत्मा गांधी सर्वोदय संघ संचलित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात भौगोलिक माहिती प्रणाली (Geographical Information System – GIS) या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात झाले.

उद्घाटन प्रसंगी बोलताना वरवंड येथील एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालयातील डॉ. राजेश सुरवसे यांनी GIS तंत्रज्ञानाचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले. कृषी नियोजन, जलसंधारण, नगररचना, पर्यावरण व्यवस्थापन तसेच आपत्ती व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांमध्ये GIS प्रणालीचा प्रभावी उपयोग होत असल्याने विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे होते. व्यासपीठावर कला विभाग प्रमुख डॉ. समीर आबनावे, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे समन्वयक डॉ. निलेश शितोळे, भूगोल विभाग प्रमुख प्रा. सारिका ढोणगे, अभ्यासक्रम समन्वयक प्रा. झेबा तांबोळी आदी उपस्थित होते.

मणिभाई देसाई यांच्या ग्रामीण विकासाच्या विचारांना अनुसरून विद्यार्थ्यांना कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दृष्टीने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आल्याचे प्राचार्य डॉ. बोऱ्हाडे यांनी सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देत रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये नकाशा निर्मिती, उपग्रह प्रतिमा विश्लेषण, स्थानिक माहिती व्यवस्थापन, डिजिटल मॅपिंग तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे प्रा. सारिका ढोणगे यांनी प्रास्ताविकात स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी स्वाती शिंदे हिने केले. आभार प्रदर्शन प्रा. झेबा तांबोळी यांनी केले. यावेळी कला विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.