पुणे : महायुती आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी अनेक ठिकाणी विजयी होत असली तरी महायुतीकडून रिपब्लिकन पक्षाला अपेक्षित महत्त्व दिले जात नसल्याची खंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करत आठवले म्हणाले, “महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढविल्या जाव्यात. मुंबई महापालिकेत १७ ते १८ आणि पुणे महापालिकेत २० जागांची मागणी आम्ही केली आहे.” जागावाटपासाठी भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने रिपब्लिकन पक्षाशी चर्चा करावी, अशी मागणीही त्यांनी केली. यासंदर्भात ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे महापालिकेसाठी २० प्रभागांची यादी भाजपकडे सुपूर्द केल्याचे आठवले यांनी सांगितले. दीर्घ कालावधीनंतर निवडणुका होत असल्याने इच्छुकांची संख्या वाढली असून बंडखोरीचे प्रमाणही वाढले असल्याचे ते म्हणाले. महायुतीतील पक्षांनी एकमेकांवर टीका करून बेबनाव निर्माण होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वसमावेशक नेतृत्व देत असल्याचा उल्लेख करत आठवले यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले. राहुल गांधी यांनी अर्थव्यवस्थेबाबत केलेल्या टीकेलाही त्यांनी विरोध दर्शवला.
तसेच मुंडवा येथील महार वतनाच्या जमिनीच्या प्रकरणी राज्य सरकारने चौकशी समिती नेमून एका महिन्यात अहवाल सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली. महार वतनाच्या जमिनींच्या खरेदी-विक्रीवर बंदी असून अशा व्यवहारांना वेठीस धरणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
