पुणे : उरुळी कांचन येथील उन्नती कन्या विद्यालय (CBSE – संलग्नता क्र. 1131458) येथे ५ मार्च २०२६ रोजी बालवाटिका-३ चा पदवीदान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला.

कार्यक्रमाची संकल्पना मुख्याध्यापिका सौ. पदमादेवी विडप यांनी शाळेच्या संचालिका नयॉन सुरेश कांचन व अध्यक्षा डॉ. नुपूर सुरेश कांचन यांच्या मार्गदर्शनाखाली साकारली. कार्यक्रमात विद्यार्थिनींनी विविध सांस्कृतिक सादरीकरणे करून पालक व उपस्थितांची मने जिंकली.

बालवाटिका-१ पासून बालवाटिका-३ पर्यंतचा विद्यार्थिनींचा प्रवास पीपीटीद्वारे उलगडण्यात आला. या माध्यमातून विद्यार्थिनींच्या बालपणीच्या गोड आठवणींना उजाळा मिळाला.

यावेळी शाळेच्या अध्यक्षा डॉ. नुपूर सुरेश कांचन व मुख्याध्यापिका सौ. पदमादेवी विडप यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा देत पुढील शैक्षणिक प्रवासासाठी प्रेरणादायी संदेश दिला. “पदवीदान सोहळ्यामुळे मुलींमधील आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि शिस्तीची जाणीव अधिक दृढ होईल,” असे त्यांनी सांगितले.

यानंतर पालकांनी पणत्या लावून दीपप्रज्वलन केले व आपल्या मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच या वर्षभरात झालेल्या विविध शैक्षणिक स्पर्धांमध्ये मिळालेल्या प्रमाणपत्रे व बक्षिसांचे वितरण शाळेच्या अध्यक्षा डॉ. नुपूर सुरेश कांचन, मुख्याध्यापिका सौ. पदमादेवी विडप आणि मॅनेजर आफरीन सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले. १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या कराटे परीक्षेच्या प्रमाणपत्रांचेही वितरण करण्यात आले.

प्रत्येक विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावरील आनंदी हास्य आणि पालकांच्या डोळ्यातील अभिमानाची चमक यामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षकवृंदांनी सहकार्य केले.

हा पदवीदान सोहळा केवळ शैक्षणिक टप्प्याचा समारोप नसून विद्यार्थिनींच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा एक सुंदर प्रारंभ ठरला. सोहळ्यामुळे शाळेच्या परिसरात आनंद, उत्साह आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *