पुणे : वाघोली येथे ६८व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा भव्य शुभारंभ मातृशक्तीच्या हस्ते उत्साहात पार पडला. रामकृष्ण सातव पाटील यांच्या आयोजनातून झालेल्या या सोहळ्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
उद्घाटन प्रसंगी बोलताना सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या समृद्ध कुस्ती परंपरेचा गौरव केला.

“कुस्तीमधूनच देशाला पहिले ऑलिम्पिक यश मिळाले. या मातीत अनेक दिग्गज मल्ल घडले असून ही परंपरा जपणे गरजेचे आहे,” असे त्यांनी सांगितले. खेळाडूंनी प्रामाणिकपणे खेळ सादर करून राज्याचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करावे, असे आवाहनही त्यांनी केले. स्पर्धेचे आयोजन दिमाखदार झाल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.

महापौर मंजुषा नागपुरे यांनी हा सोहळा महिलांच्या कर्तृत्वाचा उत्सव असल्याचे सांगितले. “कुस्तीला जागतिक स्तरावर अधिक ग्लॅमर मिळणे आवश्यक आहे. यंदा माजी विजेतेही सहभागी होत असल्याने स्पर्धा रंगतदार होणार आहे,” असे त्यांनी नमूद केले.
आयोजक रामकृष्ण सातव पाटील यांनी यंदा सुमारे चार हजार महिलांचा सहभाग झाल्याचे सांगत कुस्तीबाबतचा दृष्टिकोन बदलण्याची गरज व्यक्त केली. गावातील दानशूर व्यक्तींच्या योगदानामुळे स्पर्धा भव्य स्वरूपात होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यंदाच्या स्पर्धेत विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र केसरी विजेत्याला फॉर्च्युनर, उपविजेत्याला स्कॉर्पिओ N, तर विविध गटांतील विजेत्यांना दुचाकी देण्यात येणार आहेत. १८ ते २२ मार्चदरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेकडे राज्यभरातील कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले आहे.