पुणे : प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि गिव्ह मी ट्रीज ट्रस्ट’ चे संस्थापक स्वामी प्रेम परिवर्तनजी उर्फ पीपल बाबा यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘ग्रीन लेगसी वीक’ अंतर्गत केसनंद येथील श्री जोगेश्वरी विद्यालयात विशेष वृक्षारोपण व वृक्षदान सोहळा उत्साहात पार पडला. या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या उद्देशाने शाळेतील विद्यार्थ्यांना तब्बल ६०० फळझाडांची रोपे वाटप करण्यात आली.

पीपल बाबांनी गेल्या ४९ वर्षांत देशभरात २.४ कोटींहून अधिक झाडांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचे मोठे कार्य उभे केले आहे. त्याच कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी यंदाचा वाढदिवस केवळ उत्सव न ठेवता ‘शाश्वत उपजीविका ’ या संकल्पनेवर आधारित उपक्रम म्हणून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचा उद्देश केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित नसून, ग्रामीण कुटुंबांना भविष्यात उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे हा आहे. वाटप करण्यात आलेल्या रोपांमध्ये आंबा व पेरू (आर्थिक उत्पन्नासाठी), सीताफळ व जांभूळ (कमी पाण्यात येणारी व पोषणमूल्ये असलेली), तसेच लिंबू व कढीपत्ता (घरगुती वापर व स्थानिक बाजारपेठेसाठी उपयुक्त) या झाडांचा समावेश होता.
यावेळी पीपल बाबा म्हणाले, “झाडे ही निसर्गाची फुफ्फुसे आहेतच; पण ग्रामीण भागातील गरिबी दूर करण्याचेही ते प्रभावी साधन आहे. विद्यार्थ्यांनी ही झाडे आपल्या घराच्या परिसरात लावून त्यांचे संगोपन करावे, जेणेकरून भविष्यात हीच झाडे त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक आधार बनतील.”

कार्यक्रमात शाळेतील ६०० विद्यार्थ्यांनी ‘एक विद्यार्थी, एक झाड’ ही मोहीम राबविण्याची शपथ घेतली. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या झाडाला नाव देत त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली.
या प्रसंगी केसनंद गावचे सरपंच विशाल भाऊ हरगुडे, श्री जोगेश्वरी विद्यालयाच्या प्राचार्या निर्मला सोही, गिव्ह मी ट्रीज ट्रस्टचे कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
‘ग्रीन लेगसी वीक’ या उपक्रमामुळे परिसरातील पर्यावरणाचे संरक्षण होणार असून, येत्या काही वर्षांत या फळझाडांमधून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. शाळेच्या प्रशासनासह विद्यार्थ्यांनी पीपल बाबांच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.