पुणे: पुरोगामी माध्यमिक विद्यालयातील जेष्ठ सेवक ह.भ.प. सुरेश कांचन यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हा स्तरावरील ‘आदर्श सेवक’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
अतिशय संवेदनशील, संयमी स्वभाव आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने केलेल्या कार्यामुळे कांचन यांनी शिक्षक–कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांमध्ये विश्वास आणि आपुलकीचे नाते निर्माण केले आहे. पुरोगामी माध्यमिक विद्यालय सेवक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी संस्थेच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले. तसेच हवेली तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष म्हणून सामाजिक–धार्मिक उपक्रमांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
वडिलकीच्या नात्याने सर्वांना मार्गदर्शन करणारे आणि प्रेमाने जपणारे कांचन यांचा गौरव होत असल्याने पुरोगामी परिवारात समाधानाची भावना व्यक्त केली जात आहे. पुरस्कार प्रदान समारंभ लवकरच पार पडणार असून शैक्षणिक क्षेत्रातील त्यांची निष्ठा व सेवाभाव अधोरेखित करणारा हा सन्मान मानला जात आहे.
