पुणे : हवेली पंचायत समितीच्या सभापतीपदाची सूत्रे स्वीकारताच सभापती युवराज काकडे यांनी कामाचा झपाटा दाखवत थेट आरोग्य यंत्रणेवर धडक दिली. कुंजीरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अचानक भेट देत त्यांनी आरोग्य सेवांचा सखोल आढावा घेत प्रशासनाला सज्ज राहण्याचा स्पष्ट इशारा दिला.

काकडे यांनी आरोग्य केंद्रातील विविध विभागांची पाहणी करत वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला. रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, औषधोपचार वेळेवर मिळावेत, स्वच्छता अबाधित राहावी तसेच औषधसाठा आणि उपचार सुविधा व्यवस्थित उपलब्ध असाव्यात, याबाबत त्यांनी आरोग्य विभागाला कडक सूचना दिल्या. विशेषतः महिला प्रसूतीगृहातील सुविधा अधिक सक्षम करण्यावर त्यांनी भर दिला.

नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी कोणत्या सुविधा आवश्यक आहेत याचीही माहिती त्यांनी कर्मचाऱ्यांकडून घेतली. स्थानिक स्तरावरील अडचणी तातडीने सोडवण्याची तयारी पंचायत समिती प्रशासनाने ठेवावी, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.

यावेळी बोलताना युवराज काकडे म्हणाले की, हवेली तालुक्यातील ७१ गावांमधील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, अंगणवाड्या आणि शाळांना अचानक भेटी देण्यात येणार आहेत. “प्रत्यक्ष पाहणी करून समस्या जाणून घेणार आणि त्या सोडवण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून आवश्यक ती कार्यवाही करणार,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

या पाहणीवेळी युवानेते संदेश आव्हाळे, पंचायत समिती सदस्य कृषिराज चौधरी, माजी सरपंच संतोष कुंजीर, माजी उपसरपंच भरत निगडे, संतोष कुंजीर, पोलिस पाटील मिलिंद कुंजीर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष अमर कुंजीर, विकास निगडे, चंद्रकांत बारवकर, संजय झेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. लोखंडे आणि आरोग्य केंद्रातील कर्मचारी वर्गही यावेळी उपस्थित होता.

सभापती काकडेंच्या या अचानक भेटीमुळे हवेली तालुक्यातील आरोग्य यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यासाठी प्रशासनात हालचाल सुरू झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *