पुणे : पुण्यातील स्थानिक राजकारणात लक्षवेधी घडामोड घडली असून भाजपचे आमदार बापू पठारे यांचे सुपुत्र सुरेंद्र पठारे आणि सून ऐश्वर्या पठारे यांनी एकाचवेळी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. पती-पत्नी एकाच कुटुंबातून आणि एकाच पक्षाकडून निवडणूक लढवत असल्याने पुण्यातील राजकीय वर्तुळात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे.

सुरेंद्र पठारे यांनी प्रभाग क्रमांक 4 मधून, तर ऐश्वर्या पठारे यांनी प्रभाग क्रमांक 3 मधून भारतीय जनता पार्टीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोघांनीही कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आणि शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरल्याने भाजपकडून ही निवडणूक अत्यंत गांभीर्याने लढवली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

आमदार बापू पठारे हे पुण्यातील प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. संघटनात्मक बांधणी, पक्षनिष्ठा आणि स्थानिक प्रश्नांवरील पकड यामुळे त्यांचा मतदारसंघात मजबूत जनाधार आहे. त्याच राजकीय वारशातून आता पुढील पिढी सक्रिय राजकारणात उतरल्याने पठारे कुटुंबाचा प्रभाव अधिक व्यापक होणार असल्याचे चित्र आहे.

सुरेंद्र पठारे हे यापूर्वी सामाजिक आणि पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय राहिले आहेत. स्थानिक प्रश्न, युवकांचे प्रश्न आणि नागरी सुविधांबाबत त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. तर ऐश्वर्या पठारे या महिला सक्षमीकरण, आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित उपक्रमांमुळे ओळखल्या जातात. त्यामुळे दोघांचीही प्रतिमा ‘अॅक्टिव्ह आणि उपलब्ध नेतृत्व’ अशी तयार झाली आहे.

पती-पत्नी दोघेही निवडणूक रिंगणात असल्याने प्रचारात समन्वय , कार्यकर्त्यांची ताकद आणि कुटुंबीयांचा प्रभाव याचा भाजपला फायदा होईल, अशी चर्चा आहे.

एकंदरीत, पुण्यातील ही निवडणूक केवळ प्रभागापुरती मर्यादित न राहता पठारे कुटुंबाच्या राजकीय भवितव्याची दिशा ठरवणारी ठरणार आहे. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *