पुणे : मनुष्य आयुष्यभर भौतिक सुखाच्या मागे धावत राहतो; मात्र मोहमायेच्या जाळ्यात अडकून जीवनाच्या प्रारंभ, मध्य आणि अंत या टप्प्यांचा विचार करत नाही. जन्म, वृद्धत्व आणि मृत्यू या अटळ सत्यांमधून प्रत्येकाला जावे लागते. त्यामुळे पृथ्वीवर अस्तित्व असेपर्यंत सुखी, समाधानी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी शिवतत्त्व आणि श्रीकृष्ण तत्त्व आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक व प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे महाराज यांनी केले.

पुरंदर, गुरोळी (कैलास मठ) येथे
महाशिवरात्रीच्या शुभपर्वानिमित्त शांताराम गिरी महाराज यांच्या प्रेरणेने आयोजित ‘श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी’ सामुदायिक पारायण सोहळ्यात त्यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.
शिवतत्त्व म्हणजे सर्वव्यापी चैतन्य, अंतर्गत शांती, संरक्षण आणि आवश्यकतेनुसार विनाशाची शक्ती होय, असे सांगत त्यांनी भगवद्गीतेतील प्रकृती, जीवात्मा, कालचक्र, कर्म आणि परमेश्वर या तत्त्वज्ञानाचा उलगडा केला. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, निष्काम कर्मयोग आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग म्हणजे श्रीकृष्ण तत्त्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुरंदरची भूमी साधू-संतांच्या वास्तव्याने पावन झालेली असून येथे अनेक सुप्रसिद्ध देवस्थाने आहेत. या देवस्थानांचा जिर्णोद्धार व विकास केल्यास धार्मिक पर्यटनाला चालना मिळून स्थानिक अर्थकारणाला बळ मिळू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास संपत खेडेकर (माजी सरपंच), परशुराम खेडेकर (माजी उपसरपंच), बापू मार्तंड खेडेकर, उत्तम नामदेव खेडेकर, मधु खेडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच प्रवचनकार तानाजी खेडेकर महाराज, वसलाताई मोडक महाराज, महादेव महाराज खराडे, केरूजी महाराज चव्हाण, मुक्ताबाई चव्हाण महाराज, शिवाजी भोसले महाराज यांचीही प्रवचने झाली.
कीर्तनकार मोहिनी ताई मुळीक (बारामती), गोरख सुतार महाराज (आळंदी), संतोष महाराज गाडेकर (भिगवण), भय्यू महाराज झेंडे (दिवे), कोल्हे ताई (पुरंदर) आणि बाळकृष्ण महाराज गोगावले यांनी कीर्तन सादर केले.

कार्यक्रमाचे आयोजन समस्त ग्रामस्थ गुरोळी, कैलास मठ व श्री शिवशंकर मंदिर भक्तगण यांच्या वतीने करण्यात आले होते. पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *