पुणे: दुचाकीस्वार चोरट्यांनी पायी चालत जाणाऱ्या ज्येष्ठ महिलेचा पाठलाग करून तिच्या गळ्यातील १ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना पुण्यातील कर्वेनगर परिसरात मंगळवारी (ता. २४ ) सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोतनीस रस्त्यावर घडली.
याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अलंकार पोलिस ठाण्यात दुचाकीवरील तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला हनुमाननगर परिसरात राहतात. २४ डिसेंबर रोजी सायंकाळी त्या पायी जात असताना दुचाकीवरील तीन चोरट्यांनी पोतनीस रस्ता परिसरात त्यांना गाठले. क्षणाचाही विलंब न करता चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले आणि वेगाने पळ काढला.
या घटनेनंतर महिलेने आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. त्यानंतर महिलेने तातडीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या चित्रीकरणाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
