पुणे : कुंजीरवाडी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ. पल्लवी युवराज काकडे आणि पंचायत समितीचे उमेदवार कु. संग्राम मच्छिंद्रभाऊ कोतवाल यांच्या संयुक्त गाठीभेटी दौऱ्याने कुंजीरवाडी परिसर अक्षरशः दणाणून गेला.
गावात दाखल होताच कार्यकर्ते, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी फुलहार घालून, जोरदार घोषणा देत उमेदवारांचे जल्लोषात स्वागत केले. कुंजीरवाडीतील वातावरण पूर्णपणे निवडणूकमय झाले होते.

घराघरांत जाऊन थेट जनतेशी संवाद साधत उमेदवारांनी ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा, शिक्षण व्यवस्था, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी या ज्वलंत मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.
“विकासकामांना गती देत पारदर्शक, लोकाभिमुख कारभार हाच आमचा अजेंडा आहे,” असा ठाम निर्धार सौ. पल्लवी काकडे यांनी यावेळी व्यक्त केला.

तर पंचायत समिती स्तरावर गावकेंद्रित विकास, मूलभूत सुविधांचे बळकटीकरण आणि प्रशासनात जनतेचा थेट सहभाग यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे कु. संग्राम कोतवाल यांनी ठणकावून सांगितले. त्यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले.
ग्रामस्थांनीही दोन्ही उमेदवारांवर विश्वास व्यक्त करत विकासाच्या वाटचालीत खंबीर साथ देण्याची ग्वाही दिली. या गाठीभेटी दौऱ्यामुळे कुंजीरवाडीत सकारात्मक आणि उत्साही वातावरण निर्माण झाले असून आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांचा जोश आणि जनतेचा प्रतिसाद स्पष्टपणे दिसून आला. या गावभेट कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला असून कुंजीरवाडीतील राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे.