पुणे : आपल्या आयुष्यातील तब्बल ४८ हून अधिक वर्षे वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनासाठी समर्पित करणारे आधुनिक युगातील ‘ वृक्षमित्र’ पीपल बाबाजी यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त देशभरात ‘द ग्रीन लेगसी वीक’ साजरा केला जात आहे.
या मोहिमेअंतर्गत फुलगाव येथील हरी उद्धव धोत्रे महाविद्यालयात निसर्ग संवर्धन आणि विद्यार्थी प्रबोधनाचा प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी मैदानावर एकत्र येऊन साकारलेली पिंपळाच्या पानाची भव्य मानवी आकृती.

पीपल बाबाजींचे पिंपळाच्या झाडांशी असलेले अतूट नाते लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही रचना केली. “वृक्ष वाचवा, जीवन वाचवा” अशा घोषणांनी यावेळी संपूर्ण महाविद्यालय परिसर दुमदुमून गेला. या अनोख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी पीपल बाबाजींना त्यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त आगळ्यावेगळ्या ‘ग्रीन’ शुभेच्छा दिल्या.
केवळ वृक्षारोपण पुरेसे नसून निसर्गाविषयीची शास्त्रीय माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचणे तितकेच महत्त्वाचे असल्याची जाणीव ठेवून *गिव्ह मी ट्रीज ट्रस्ट’च्या वतीने विद्यार्थ्यांना *६० निसर्गविषयक पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या पुस्तकांमध्ये वृक्षांचे औषधी उपयोग, पर्यावरणीय बदल तसेच जैवविविधतेविषयी माहितीचा समावेश होता.

पीपल बाबाजींच्या ६० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘६०’ पुस्तके वाटण्याचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमात पीपल बाबाजींच्या कार्याचा गौरव करताना, “पीपल बाबांनी लावलेली कोट्यवधी झाडे हा केवळ आकडा नसून येणाऱ्या पिढीसाठी दिलेली संजीवनी आहे,” अशा भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.
महाविद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पीपल बाबाजींच्या संघर्षमय वाटचालीची माहिती दिली.
या उपक्रमामुळे परिसरात पीपल बाबाजींच्या कार्याचे तसेच ‘गिव्ह मी ट्रीज ट्रस्ट’च्या पर्यावरणपूरक चळवळीचे सर्वत्र कौतुक होत आहे.