पुणे: महाराष्ट्रातल्या २९ महापालिकांच्या निवडणुकांत पवार ब्रँडचं वर्चस्व असल्याचा गवगवा “पवार बुद्धीचे” पत्रकार, विश्लेषक आणि स्टुडिओत बसलेले कथित राजकीय तज्ज्ञ सातत्याने करत होते. ठाकरे आणि पवार हेच दोन ब्रँड महाराष्ट्रात चालतात, बाकी सगळे फसवे फुगे आहेत, असे ढोल-ताशे वाजवले जात होते. मात्र, पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या मतदारांनी हा सगळा ढोल फोडून काढला आहे.
एक्झिट पोलमधून जे चित्र समोर आले आहे, ते पवार काका–पुतण्यांच्या राजकीय गणितांना जबरदस्त धक्का देणारे आहे. प्रत्यक्ष निवडणुकीत निकालही असाच लागला, तर पवार नावाच्या ब्रँडचा पुरता बोऱ्या उडाल्याचे वास्तव नाकारता येणार नाही. पवार बुद्धीचे ढोल केरात शरद पवार आणि अजित पवार यांचे तथाकथित “राजकीय डाव”, “खेळ्या”, “मास्टरस्ट्रोक” यांची बहारदार वर्णने अनेक पत्रकारांनी केली. विरोधकांना कसे चकवले जाते, कसे नेस्तनाबूत केले जाते, याच्या कहाण्या रंगवल्या गेल्या.

पण पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या मतदारांनी या सगळ्या कथांवर मतदानातून थेट पाणी फेरले.
पुण्यात भाजपच निर्विवाद नंबर वन
पुणे महापालिकेत एक्झिट पोलनुसार भाजप ९३ ते ९६ जागांसह थेट अव्वल स्थानी पोहोचत आहे.
तर पवार काका–पुतण्यांच्या आघाडीला केवळ ४३ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
शिवसेना : ७ जागा
काँग्रेस : ८ जागा
म्हणजेच एकेकाळी पुण्यावर पकड असल्याचा दावा करणाऱ्या पवार गटांना सिंगल डिजिटच्या साथीदारांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये तर चित्र आणखी ठळक आहे. महेश लांडगे यांनी अजित पवारांच्या दादागिरीवर थेट मात केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या राजकीय बळामुळे महेश दादांनी असा काही जोर लावला, की अजितदादांच्या धोबीपछाड, घुटना डावाच्या वल्गना हवेतच विरल्या.
भाजप : ७० जागा
दोन्ही राष्ट्रवादी मिळून : ४९ जागा
हा आकडा स्वतःच बरंच काही बोलून जातो. मतदारांनी दिला स्पष्ट संदेश
पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या मतदारांनी फक्त सत्ता हिसकावली नाही, तर पवार काका–पुतण्यांना पुन्हा सत्तेच्या आसपासही फिरकू दिले नाही.
ब्रँड, प्रचार, मीडिया व्यवस्थापन आणि कथित राजकीय बुद्धिमत्ता या सगळ्यावर मतदारांनी एकच शिक्का मारला.
आजचा निकालही एक्झिट पोलप्रमाणेच लागले, तर हे मान्य करावंच लागेल की, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ‘पवार ब्रँड’चा पुरता बोऱ्या वाजला आहे.