पुणे: श्री क्षेत्र शिर्डी (जि. अहिल्यानगर) येथे बी.बी.सी. फिल्म प्रॉडक्शन महाराष्ट्र राज्य व साई विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा ‘आध्यात्मिक राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ महंत श्री. गोपालव्यास कपाटे महानुभाव यांना मोठ्या दिमाखात प्रदान करण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन व अध्यक्षस्थान प्राध्यापक सुदाम संसारे यांनी भूषविले.

कार्यक्रमाला महाराष्ट्रासह इतर राज्यांतून विविध क्षेत्रांतील नामवंत मान्यवरांची उपस्थिती लाभली. धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गजांनी या सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. पुरस्कार स्वीकारताना महंत श्री. गोपालव्यास यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची विचार प्रणाली ही स्त्री स्वातंत्र्य, समानता, मानवता, जातीयतेविरुद्ध भूमिका, उंच-नीच भेद नाकारून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी आहे. अंधश्रद्धा व कर्मकांडावर प्रहार करत नीतिमूल्यांची जपणूक करणारी ही मौलिक विचारधारा समाजाच्या उत्थानासाठी अत्यंत पोषक आहे. त्यामुळे मला मिळालेला हा मान-सन्मान मी विनम्रपणे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी समर्पित करीत आहे.”

कार्यक्रमात डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेचे संचालक संजय टिळेकर, हवेली तालुका पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष विजय टिळेकर, उरुळी कांचन पतसंस्थेचे संचालक आबासाहेब टिळेकर, टिळेकरवाडी तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष संतोष राऊत, कारभारी टिळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल महंत श्री. गोपालव्यास यांनी आयोजक व अध्यक्ष सुदाम संसारे सर तसेच त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन केले. सुव्यवस्थित नियोजन, शिस्तबद्ध कार्यक्रम व भव्य आयोजनामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला.