पुणे: लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील बारा वर्षांची विद्यार्थिनी अनुष्का किरणकुमार पाटोळे हिची निर्घृण हत्या करून ती आत्महत्या असल्याचा बनाव करण्यात आल्याच्या निषेधार्थ सोमवारी (ता. १२) पुणे–सोलापूर रोडवरील उरुळी कांचन येथे तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन एबीएस क्रांती फोर्सचे सर्वेसर्वा सचिन साठे यांच्या आदेशानुसार तसेच सकल बहुजन समाज व सकल मातंग समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.

या अमानुष घटनेमुळे संपूर्ण समाजात संतापाची लाट उसळली असून, न्याय मिळावा या मागणीसाठी मातंग समाज व बहुजन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. आंदोलनादरम्यान पुणे–सोलापूर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांना आंदोलकांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालवावा व कठोरात कठोर, फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी निवेदनात करण्यात आली.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता. आंदोलन शांततेत पार पाडण्यात आले. हे आंदोलन एबीएस क्रांती फोर्स पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ आडागळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.
यावेळी विलास झोंबाडे, अनिल कांबळे, गणेश कांबळे, भारत लोणारी, विकास लोणारी, चंद्रकांत गुरव, मातंग समाजाचे नेते दिगंबर जोगदंड, आकाश म्हात्रे, विजय सकट, संजय शिताळे, प्रवीण लोंढे, चंद्रकांत खलसे, किसन खलसे, शेखर बडेकर, रूपाली आवारे, सोनाली जगताप, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे राज्य संघटक आबा चव्हाण, प्रदीप शेंडगे, गणेश लोणारी, दत्ता लोणारी, अतुल पाटोळे, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष जगताप, किरण कसबे मिथुन वाघमारे, अमोल झोंबाडे, हरिभाऊ नवगिरे यांच्यासह अनेक समाजबांधवांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
दरम्यान, आंदोलनादरम्यान योग्य सहकार्य केल्याबद्दल आंदोलकांनी पोलिस प्रशासनाचे आभार मानले.