पुणे: उरुळी कांचन जिल्हा परिषद गटात शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला संभ्रम अखेर संपुष्टात आला असून ठाकरेंची मशाल ठामपणे अनिल रामू कदम यांच्या हाती देण्यात आली आहे. तालुका प्रमुख स्वप्नील कुंजीर पाटील यांनी अनिल कदम यांना एबी फॉर्म देत उमेदवारी जाहीर केली आणि विजयी शुभेच्छा दिल्या.

हवेली तालुक्यातील उरुळी कांचन जिल्हा परिषद गटातून ठाकरे गटाचे दोन एबी फॉर्म दाखल झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. अधिकृत उमेदवार कोण, हा प्रश्न कार्यकर्त्यांपासून मतदारांपर्यंत चर्चेचा विषय ठरला होता.
एकीकडे तालुका प्रमुख स्वप्नील कुंजीर पाटील यांनी अनिल कदम यांना उमेदवारी जाहीर केली असताना, दुसरीकडे राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत काम करत असल्याचा आरोप असलेल्या उरुळीतील काही स्वयंघोषित शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वेगळा उमेदवार पुढे करत जिल्हा प्रमुख खांडे भराड यांच्याकडून एबी फॉर्म मिळवल्याचा दावा केला होता.

मात्र, या सर्व गोंधळाला पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर आणि तालुका प्रमुख स्वप्नील कुंजीर पाटील यांनी निर्णायक पूर्णविराम दिला. त्यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळवून, पक्षाचा अधिकृत उमेदवार अनिल रामू कदम हेच असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर निवडणूक प्रशासनानेही अनिल कदम यांनाच ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले.
या निर्णयामुळे उरुळी कांचनमध्ये ठाकरे गटातील अंतर्गत बंडखोरीला मोठा धक्का बसला असून, मशाल कोणाच्या हाती हे आता निर्विवाद झाले आहे. स्वप्नील कुंजीर यांच्या ठाम भूमिकेमुळे पक्षाची शिस्त आणि अधिकृत भूमिका अधोरेखित झाली असून, आगामी निवडणुकीत अनिल कदम यांची लढत अधिक आक्रमक आणि निर्णायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.