पुणे : उरुळी कांचन (ता. हवेली) येथे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उरुळी कांचन पोलिस स्टेशनच्या वतीने गुरुवारी (ता. ५ ) सकाळी रूट मार्चचे आयोजन करण्यात आले. सकाळी १०.५० ते ११.०० या कालावधीत हा रूट मार्च शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.

हा रूट मार्च उरुळी कांचन पीएमटी चौक येथून सुरू होऊन आश्रम रोड, जय मल्हार रोड, ग्रामपंचायत कार्यालय परिसर, सटवाई चौक, महात्मा गांधी विद्यालय, तळवाडी चौक मार्गे पुन्हा पीएमटी चौक येथे येऊन शेवटी पोलिस स्टेशन येथे समाप्त झाला. या मार्गावरील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे तसेच निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाकडून हा रूट मार्च काढण्यात आला.

रूट मार्चदरम्यान पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची ठळक उपस्थिती दिसून आली. या मार्चमध्ये १ पोलिस निरीक्षक, १ सहाय्यक पोलिस निरीक्षक, ३ पोलिस उपनिरीक्षक आणि ३० पोलिस अंमलदार सहभागी झाले होते. सर्व अधिकारी व अंमलदारांनी ठरविलेल्या मार्गावरून शिस्तीत संचलन करत नागरिकांशी संवाद साधला.
निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर शांतता, कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिस प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असून नागरिकांनीही कोणत्याही अफवा, गैरप्रकार किंवा बेकायदेशीर हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांच्याकडून करण्यात आले.
संपूर्ण रूट मार्च कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत व यशस्वीरीत्या पार पडला.