पुणे : सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेल्या भारतीय संविधानाच्या संकल्पनेवर आधारित ‘संविधान उद्यान’ महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने साकारण्यात येणार आहे. उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या या संकल्पनेला महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त संभाजी उद्यान येथे आयोजित फुले, फळे आणि भाज्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन उपमहापौर वाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सभागृह नेते गणेश बीडकर, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बनकर, उद्यान विभागाचे प्रमुख घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

संपूर्ण देशाचा कारभार सुरळीतपणे चालविणाऱ्या संविधानाची सर्व नागरिकांना, विशेषतः विद्यार्थी वर्गाला ओळख व्हावी, संविधानातील मूल्ये, नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये यांची माहिती मिळावी, या उद्देशाने या उद्यानाची उभारणी करण्यात येणार आहे. या उद्यानात संविधानाच्या प्रमुख कलमांची माहिती, ऐतिहासिक पार्श्वभूमी तसेच प्रेरणादायी संदेश प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती वाडेकर यांनी दिली.
सर्वपक्षीय नगरसेवक या प्रस्तावाला मान्यता देतील व प्रकल्पासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, आयुक्त नवल किशोर राम यांनी ‘संविधान उद्यान’ उभारण्यासाठी दोन दिवसांत उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी करून जागा निश्चित करण्यात येईल, अशी घोषणा केली.