पुणे : मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पवार पब्लिक स्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका जयश्री किरण नवले यांना यंदाचा मानाचा ‘आदर्श शिक्षिका महाराष्ट्र भाषा रत्न’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

अमृतानुभव फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने आयोजित ‘विश्व मराठी भाषा कर्तृत्व संमेलन २०२६’मध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडला.

जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून जयश्री नवले यांची या पुरस्कारासाठी एकमताने निवड करण्यात आली. सुप्रसिद्ध पार्श्वगायक ज्ञानेश्वर मेश्राम (सारेगमप फेम), सांगलीचे युवा उद्योजक राहुल पाटील, चित्रपट निर्माते व लेखक संदीप राक्षे, शास्त्रीय नृत्य कलाकार कु. रुचिरा तसेच स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. बी. एन. खरात यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारताना जयश्री नवले भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, “हा सन्मान माझ्या गुरुजनांचा, आई-वडिलांचा, सासरच्या मंडळींचा आणि पवार पब्लिक स्कूलच्या प्राचार्या दीपा शानबाग, सहकारी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रेमाचे फळ आहे. या पुरस्कारामुळे मराठी भाषेची सेवा करण्याची माझी जबाबदारी अधिक वाढली असून, यापुढे अधिक निष्ठेने कार्य करण्याची ग्वाही मी देते.”
या यशामुळे पवार पब्लिक स्कूलसह शैक्षणिक वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.