पुणे : टिळेकरवाडी गावाच्या प्रथा-परंपरेनुसार उपसरपंच पदाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर माजी उपसरपंच वैशाली चौरे यांनी वेळेत राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त झाले होते. या रिक्त जागेसाठी झालेल्या निवडणूक प्रक्रियेत कल्पना श्रीकांत टिळेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

ही निवड सरपंच गोवर्धन टिळेकर व ग्रामविकास अधिकारी प्रवीण खराडे यांनी अधिकृतरीत्या घोषित केली.

गावात अनेक वर्षांपासून चालत आलेली बिनविरोध निवडीची परंपरा यामुळे कायम राहिल्याचे मत ज्येष्ठ नेते व यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र टिळेकर यांनी व्यक्त केले.

गावात सलोखा, एकोपा व सहकार्याची भावना टिकून राहणे हीच या परंपरेची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी सरपंच गोवर्धन टिळेकर, माजी सरपंच सुभाष लोणकर, माजी सरपंच गणेश टिळेकर, उपसरपंच सुषमा टिळेकर, सुशील राऊत, नंदा राऊत, माजी उपसरपंच वैशाली चौरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच बिनविरोध निवडीसाठी विशेष प्रयत्न करणारे श्रीदत्त सेवा ट्रस्टचे अध्यक्ष संतोष टिळेकर, पोलिस पाटील विजय टिळेकर, सोसायटी अध्यक्ष अक्षय टिळेकर, लक्ष्मण आबा टिळेकर, सुभाष टिळेकर, बाळासाहेब चौरे, रोहिदास टिळेकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अमर टिळेकर, महेश टिळेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनिर्वाचित उपसरपंच कल्पना टिळेकर यांनी आपल्या मनोगतात ग्रामस्थांचे आभार मानत, गावातील रखडलेली विकासकामे सर्वांना सोबत घेऊन पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. पारदर्शक कारभार, विकासाभिमुख निर्णय व गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण कटिबद्ध राहू, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *