पुणे : “स्वागताला दारं उघडी ठेवा! मी येतोय,” या दमदार घोषणेसह अभिनेता रितेश देशमुख घेऊन येत आहे बिग बॉस मराठी सिझन ६. नव्या प्रोमोच्या प्रदर्शनापासूनच संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा रंगली असून बिग बॉस मराठी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
रितेश भाऊंचा हटके लूक, आत्मविश्वासाने भरलेला स्वॅग आणि “मागचा सिझन वाजवलाय, यंदाचा गाजवायचाय… आहात ना तयार!” हा डायलॉग प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा ठरतोय. मागील सिझनने प्रचंड धुमाकूळ घातल्यानंतर यंदाचा सिझनही तितकाच गाजणार, अशी खात्री या प्रोमोने दिली आहे. Swag तोच असला, तरी यंदाचा पॅटर्न पूर्णपणे रितेश भाऊंचा असणार, एवढं मात्र नक्की!
भाऊच्या एंट्रीसाठी उभारलेला आलिशान सेट, भव्य मिरवणुकीसारखं वातावरण, ढोल–ताशांचा गजर, रंगीबेरंगी रोषणाई आणि तब्बल २५० ते ३०० लोकांची दणदणीत उपस्थिती यामुळे हा प्रोमो लार्जर-दॅन-लाईफ ठरला. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच रितेश देशमुख पारंपरिक वेशभूषेत झळकले असून प्रत्येक फ्रेममध्ये त्यांचा स्वॅग ठसठशीतपणे जाणवतो.
नव्या सिझनचा बिगुल वाजताच चर्चांना उधाण आलं आहे. “घरात कुणाचा नवस पूर्ण होणार? कुणाच्या सलामीने वातावरण झिंगणार?” असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात घोळत आहेत. “काही असंही असणार… पण मी गप्प नाही बसणार!” या कडक डायलॉगमुळे उत्सुकता आणखी वाढली आहे.
बिग बॉस मराठी सिझन ६ येत्या ११ जानेवारीपासून दररोज रात्री ८ वाजता कलर्स मराठी आणि JioHotstar वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता फक्त प्रतीक्षा आहे — भाऊंच्या घरात काय घडणार, याची…
