पुणे: हवेली तालुक्यातील खोरावडा येथील शाळेला ह्युमॅनिटरियन्स ग्रुप, सेवा सहयोग फाउंडेशन आणि रचना संस्था, पुणे यांच्या संयुक्त प्रयत्नांतून नूतन स्वच्छतागृहाचे हस्तांतरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन आर्थिक सहयोगातून मुला–मुलींसाठी स्वतंत्र, स्वच्छ व आधुनिक स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. या तीनही संस्थांच्या पुढाकाराने आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तब्बल २६ शाळांना नवी स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
कार्यक्रमाला अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचे विवेक पाटणकर, ह्युमॅनिटरियन्स ग्रुपचे तुकाराम व शोभा गायकवाड, सेवा सहयोग फाउंडेशनचे शैलेश घाटपांडे तसेच रचना संस्थेच्या संचालिका स्वाती चव्हाण, जिल्हा समन्वयक कल्पना घुले, तालुका समन्वयक माधुरी उंबरकर व शुभांगी घाडगे उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश बडधे, मुख्याध्यापक नंदकुमार कुंजीर, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांचीही उपस्थिती होती.
यावेळी स्वाती चव्हाण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्वच्छता आणि अभ्यासाचे महत्त्व सांगितले. तुकाराम गायकवाड यांनी स्वच्छता पालनासाठी मार्गदर्शन केले, तर माधुरी उंबरकर यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. रचना संस्थेच्या घरोघरी अभ्यास कोपरा या उपक्रमाची माहिती देण्यात आली. तसेच वेल्हा तालुक्यातील रांजणे शाळेतील विद्यार्थी व शिक्षक शाळा परिसराची स्वच्छता कशी राखतात, याचा व्हिडीओ दाखविण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र कुंभारकर यांनी केले, तर सुषमा भालेराव यांनी आभार मानले.
