पुणे: अजित पवारांचे निकटवर्तीय नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. शासकीय सदनिका वाटपातील गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असून त्यांची आमदारकीही धोक्यात आली आहे.

नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने १९९५ सालच्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात कोकाटेंना दोन वर्षांचा कारावास आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. याच शिक्षेला प्रथम वर्ग न्यायालयानेही २० फेब्रुवारी २०२५ रोजी दुजोरा दिला होता. या निर्णयाविरोधात कोकाटेंनी हायकोर्टात धाव घेत जामिनासाठी अर्ज केला. मात्र, औरंगाबाद खंडपीठाने तातडीची सुनावणी नाकारत शुक्रवारी सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे अटकेची टांगती तलवार कायम आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीनुसार राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी माणिकराव कोकाटेंकडील क्रीडा व तरुण कल्याण आणि अल्पसंख्यांक विकास ही दोन्ही खाती काढून घेतली आहेत. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात ही खाती उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात येत असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अजित पवार आता राज्याचे नवे क्रीडामंत्री होणार आहेत.

अटक होण्याची शक्यता असतानाच कोकाटे मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सहाव्या मजल्यावरील ६०९ क्रमांकाच्या वॉर्डमध्ये त्यांना ठेवण्यात आलं आहे.

वादग्रस्त वक्तव्ये, विधिमंडळातील रम्मी प्रकरण आणि आता न्यायालयीन शिक्षा—या सगळ्यामुळे कोकाटे सरकारसाठी डोकेदुखी ठरले होते. राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांवरील आरोपांमुळे महायुती सरकारची प्रतिमा वारंवार अडचणीत आली असून, कोकाटे प्रकरणाने त्या अडचणी आणखी वाढवल्याचं चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *