पुणे : हवेली तालुक्यातील डोंगरगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतकरी अभिजीत गायकवाड यांच्या कोथिंबिरीच्या शेतात एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल तीन बिबट्यांचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. व्यापारी कोथिंबीर खरेदीसाठी शेतात गेले असताना हा थरारक प्रकार त्यांच्या नजरेस पडला आणि क्षणार्धात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थ सतर्क झाले असून, या घटनेमुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. विशेष म्हणजे, हा भाग मानवी वस्तीच्या अगदी जवळ असल्यामुळे बिबट्यांची उपस्थिती ही गंभीर बाब मानली जात आहे. दिवसाढवळ्या बिबट्यांचे दर्शन झाल्याने वनविभागाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे आणि कुंजीरवाडीचे माजी उपसरपंच भरत निगडे यांनी या घटनेची पुष्टी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. “कोणत्याही परिस्थितीत एकट्याने शेतात जाऊ नये, लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये आणि रात्रीच्या वेळी विशेष काळजी घ्यावी,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत.

दरम्यान, वनविभागाने तातडीने या घटनेची दखल घेऊन परिसरात पाहणी सुरू करण्याची गरज व्यक्त होत आहे. बिबट्यांचा वावर वाढत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या होत्या, मात्र ठोस उपाययोजना न झाल्याने आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

डोंगरगाव परिसरात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर शेती आहे आणि अशा परिस्थितीत बिबट्यांचा वावर हा त्यांच्या जीवितासह उपजीविकेलाही धोका ठरत आहे. प्रशासनाने तातडीने पिंजरे लावून बिबट्यांना पकडण्याची मागणी जोर धरत आहे.

एकीकडे वन्यजीवांचे संरक्षण आवश्यक असले तरी नागरिकांच्या सुरक्षेशी तडजोड होऊ शकत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे आता वनविभाग आणि प्रशासन यांच्यासमोर मोठे आव्हान उभे ठाकले असून, यावर त्वरित आणि ठोस कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *