पुणे : ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीसाठी उरुळी कांचन (ता. हवेली) येथे सुरू असलेल्या वाहन परवाना शिबिरातील (कॅम्प) लायसन्स कोटा अखेर दुपटीने वाढविण्यात आला आहे. १२० असलेला कोटा २४० करण्यात आला असून, प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

या वाढीमागे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष रामदास निवृत्ती तुपे तसेच उरुळी कांचन कॅम्प ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याचे मानले जात आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांना लेखी निवेदन दिले होते.

यासंदर्भात शिरूर-हवेलीचे माजी आमदार अशोकबापू पवार तसेच कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याकडेही सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. अखेर या प्रयत्नांची दखल घेत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कोटा वाढविण्याचा निर्णय घेतला.

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने उरुळी कांचनसह जेजुरी, सासवड, भोर, शिरूर, वेल्हे, पिरंगुट व शिक्रापूर येथे महिन्यातून दोन ते तीन वेळा वाहन परवाना सेवा शिबिरे आयोजित केली जातात. ग्रामीण भागातील वाढती लोकसंख्या, खासगी व व्यावसायिक वाहनांची वाढती संख्या, तसेच वेगाने होत असलेले शहरीकरण आणि औद्योगिक विकास यामुळे परवाना अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

सध्याचा कोटा अपुरा पडत असल्याने अनेकांना लर्निंग लायसन्सनंतर कायमस्वरूपी परवाना मिळण्यासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागत होती. परिणामी, लर्निंग लायसन्सची मुदत संपण्याच्या मार्गावर असल्याने काहींना पोलिस कारवाई व आर्थिक दंडालाही सामोरे जावे लागत होते.
या पार्श्वभूमीवर उरुळी कांचन येथील मोटार ड्रायव्हिंग स्कूल धारकांनी कोटा वाढविण्याची मागणी लावून धरली होती.

अखेर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत लायसन्स कोटा दुपटीने वाढविला आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *