पुणे, ता. १३ : समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालय येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. सांस्कृतिक विभागात शाखा व जिल्हास्तरावर निबंध, वक्तृत्व, चित्रकला, कराओके स्पर्धेत यश मिळविणाऱ्या तसेच मैदानी व बंदिस्त क्रीडा स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा यावेळी गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रा. सलीम शिकलगार व प्रा. सौ. शबाना शिकलगार (ता. भोर) उपस्थित होते. त्यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद, डॉ. बापूजी साळुंखे, मातोश्री सुशीलादेवी साळुंखे व मामासाहेब काळभोर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर यांनी प्रमुख अतिथींचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
मार्गदर्शन करताना प्रा. सलीम शिकलगार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, महाविद्यालयीन जीवन हे करिअर घडविण्याचे सुवर्णपान असल्याचे सांगितले.
पदवी शिक्षणाबरोबरच विविध स्पर्धा परीक्षा, कला व क्रीडा क्षेत्रात सहभागातून सर्वांगीण विकास साधावा, असे त्यांनी प्रतिपादन केले. यावेळी प्रा. सलीम शिकलगार, प्रा. शबाना शिकलगार व प्रा. आनंदा जाधव यांनी हिंदी-मराठी गीतांचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांची मने जिंकली.

अध्यक्षस्थानावरून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थाचे सहसचिव प्राचार्य सिताराम गवळी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना, पारितोषिक म्हणजे कष्टांचा जाहीर सन्मान असल्याचे नमूद केले.
अपयश ही यशाची पहिली पायरी असून निराश न होता अधिक प्रयत्न करावेत, असा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर यांनी केले.
अहवाल वाचन प्रा. डॉ. शिवाजी गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. शिवाजी गायकवाड व प्रा. स्नेहा हिंगमिरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. मुकेश महाले यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या प्रार्थनेने तर समारोप राष्ट्रगीताने झाला.