पुणे : महाराष्ट्र सरकारच्या स्पेशल पर्पज व्हेईकल ‘मार्व्हल’च्या सहकार्याने मायक्रोसॉफ्ट इंडिया डेव्हलपमेंट सेंटर आणि सायबरआय यांनी विकसित केलेल्या अत्याधुनिक ‘महाक्राइमओएस एआय’ प्लॅटफॉर्मचे अनावरण मायक्रोसॉफ्ट एआय टूरदरम्यान मुंबईत झाले. मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि सीईओ सत्या नाडेला यांनी ही घोषणा केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्यातील डिजिटल सुरक्षितता आणि एआय-आधारित सुशासनाच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीवर चर्चा केली.

सध्या नागपूरमधील २३ पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेला महाक्राइमओएस एआय प्लॅटफॉर्म भविष्यात राज्यातील सर्व १,१०० ठाण्यांमध्ये विस्तारण्याचा प्रस्ताव आहे. वाढत्या आणि जटिल सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार आणि मायक्रोसॉफ्ट यांचे हे सहकार्य मोठी झेप मानले जात आहे. २०२४ मध्ये देशात तब्बल ३.६ दशलक्ष सायबर गुन्ह्यांच्या नोंदी झाल्याने अशा तंत्रसक्षम उपायांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “जनहितासाठी नैतिक आणि जबाबदार एआयचा वापर हा आमचा मुख्य उद्देश आहे. एआयमुळे प्रशासन, उद्योग, आरोग्य आणि शेतीसह सर्व क्षेत्रांत परिवर्तन घडण्याची क्षमता आहे.” महाक्राइमओएस एआय प्लॅटफॉर्म मायक्रोसॉफ्ट अझ्युर ओपनएआय सर्व्हिसवर आधारित असून त्वरित केस निर्मिती, डिजिटल पुरावा विश्लेषण, बहुभाषिक डेटा निष्पादन आणि कायदेशीर संदर्भ उपलब्ध करून देतो.

मायक्रोसॉफ्ट इंडिया-अध्यक्ष पुनीत चांडोक यांनी सांगितले की, “एआय सार्वजनिक सुरक्षेचे भविष्य बदलत आहे आणि हा प्लॅटफॉर्म महाराष्ट्रातील प्रत्येक अधिकाऱ्याला अधिक वेगाने व अचूकतेने तपास करण्यास सक्षम करणार आहे.”

सायबरआय आणि मार्व्हलचे अधिकारीांनीही या प्लॅटफॉर्ममुळे सायबर गुन्हे तपासात नवे मानक निर्माण होणार असल्याचे स्पष्ट केले. महाक्राइमओएस एआयचे अनावरण हे भारतभर सुरक्षित डिजिटल समाज निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *