पुणे : टिळेकरवाडी (ता. हवेली) येथील प्रगतीशील शेतकरी सौ. संगीता टिळेकर यांना महात्मा ज्योतीबा फुले मंडळतर्फे दिला जाणारा ‘कृषी रत्नभूषण’ पुरस्कार २०२६ जाहीर झाला. मंडळाच्या २३ वर्षांच्या अखंड परंपरेतील हा मानाचा पुरस्कार दि. १६ फेब्रुवारी रोजी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृह येथे पार पडलेल्या सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

यावेळी नामदार अतुल सावे, नामदार जयकुमार गोरे तसेच खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते संगीता टिळेकर यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास महापौर रवी लांडगे, अध्यक्ष हनुमंत माळी, वसंत नाना लोंढे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सौ. संगीता टिळेकर या पुणे जिल्हा परिषदेचा ‘जिजामाता महिला कृषी भूषण’ पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा ‘वसंतराव नाईक कृषी भूषण’ पुरस्कार तसेच महाराष्ट्र राज्य डाळिंब उत्पादक संघटनेचा ‘डाळिंब रत्न’ पुरस्कार प्राप्त विजेत्या आहेत. ऊरुळी कांचन पंचक्रोशीत सर्वाधिक डाळिंब उत्पादन, ड्रॅगन फळ, रेड डायमंड पेरू व पुदीना उत्पादनात त्या अग्रेसर आहेत. खडकाळ जमिनीत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून शेती विकसित करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.

परिसरातील अनेक शेतकऱ्यांना त्या सातत्याने मार्गदर्शन करतात. राजकारण, समाजकारण आणि विविध व्यवसायांत सक्रिय असतानाही त्यांनी शेतीशी असलेली नाळ कायम ठेवली आहे. कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शेतीतही यश संपादन करता येते, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे.
समारोपावेळी बोलताना सुशिक्षित तरुणांनी शेतीकडे वळावे, असा संदेश सौ. संगीता टिळेकर त्यांनी दिला. पुढील दहा वर्षांत शेती व शेतकरी हे भारताच्या अर्थकारणाचे केंद्रबिंदू ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.