पुणे : भारतीय जनता पक्ष (भाजपा) पुणे शहर व्यापारी आघाडीच्या अध्यक्षपदी युवा, गतिमान आणि संघर्षशील नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या श्री. महेश गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे शहरातील व्यापारी वर्गामध्ये नव्या ऊर्जा, विश्वास आणि संघटनात्मक बळाची भावना निर्माण झाली आहे.

या नियुक्तीप्रसंगी भाजपा पुणे शहर अध्यक्ष श्री. धीरज घाटे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री. राजेश पांडे तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी गुप्ता यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

श्री. गुप्ता यांनी गेल्या अनेक वर्षांपासून व्यापारी वर्गाच्या विविध प्रश्नांवर आक्रमक व परिणामकारक भूमिका घेतली आहे. शासन, महानगरपालिका, पोलीस प्रशासन तसेच विविध शासकीय विभागांमध्ये समन्वय साधत व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला आहे. अन्यायकारक कारवायांविरोधात आवाज उठविताना निवेदनांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष तोडगा काढण्याची कार्यपद्धती त्यांनी रुजविली आहे.

‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’च्या दृष्टीने इन्कम टॅक्स, जीएसटी, परवाना प्रक्रिया, स्थानिक प्रशासनातील अडथळे तसेच अनावश्यक दंडात्मक कारवायांविरोधात त्यांनी ठोस पाठपुरावा केला आहे.

बाजारपेठांतील पायाभूत सुविधा, पार्किंग, सुरक्षा व्यवस्था आणि व्यापारी संरक्षण या विषयांवरही त्यांनी सक्रिय नेतृत्व केले आहे.
भाजपा व्यापारी आघाडी ही केवळ संघटना नसून व्यापाऱ्यांच्या सन्मान, सुरक्षितता आणि हक्कांसाठी लढणारे प्रभावी व्यासपीठ ठरेल, अशी भूमिका श्री. गुप्ता यांनी मांडली. त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरातील व्यापारी वर्ग अधिक संघटित, सशक्त आणि राजकीयदृष्ट्या प्रभावी होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

शहरातील व्यापाऱ्यांसाठी धोरणात्मक, निर्णयक्षम आणि परिणामकारक नेतृत्व म्हणून श्री. महेश गुप्ता यांची नियुक्ती महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *