पुणे : उरुळी कांचन पोलिस स्टेशन येथे गु.र. नं. ३२८/२०२५, बी.एन.एस. कलम १०३(१) अन्वये दाखल खून प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. वैयक्तिक वादातून संगनमताने ही हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे.
दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७.३० वाजता ते १९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान, मौजे पेठ गावच्या हद्दीत, थेऊर–पेठ रोडलगत, म्हसोबा मंदिराजवळील शेतात संपत तुकाराम चौधरी (वय ४८, रा. वडाचीवाडी पेठ) यांची अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने मारहाण करून हत्या केली होती. या प्रकरणी मृताचे पुत्र यश संपत चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून १९ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी उरुळी कांचन पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेची दोन स्वतंत्र तपास पथके नियुक्त करण्यात आली होती. तपासादरम्यान संशयित आरोपी स्वप्निल शिवाजी चौधरी व आदेश रेवलनाथ चौधरी यांचा मध्यप्रदेशातील उज्जैन व सोलापूर येथे शोध सुरू होता. तांत्रिक तपास व मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी सोलापुरात असल्याची खात्री झाल्यानंतर दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी उरुळी कांचन पोलिस पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
तपासात असे निष्पन्न झाले आहे की, मयत व आरोपी स्वप्निल चौधरी यांच्यात यापूर्वी वैयक्तिक वादातून गुन्हे दाखल होते. याच वादातून आरोपींनी संगनमताने सदर खून केल्याचे समोर आले आहे. आरोपींना न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी रिमांड घेण्यात येणार असून, पुढील सखोल तपास सुरू आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, मा. अपर पोलिस अधीक्षक (बारामती विभाग) गणेश बिराजदार, उपविभागीय पोलिस अधिकारी (दौंड विभाग) बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तसेच पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर (स्थानीय गुन्हे शाखा) व पोलिस निरीक्षक सचिन वांगडे (उरुळी कांचन पोलिस स्टेशन) यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रविण कांबळे हे करीत आहेत.
