पुणे : बिहारमधील गया येथे असलेल्या ऐतिहासिक महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध धम्मीयांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी पुणे परिसरातील भिक्खू संघातर्फे राष्ट्रव्यापी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. हे आंदोलन मंगळवार, १० मार्च २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान (जिल्हाधिकारी कार्यालयासमोर), पुणे येथे होणार असल्याची माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

या पत्रकार परिषदेला आंदोलनाचे समन्वयक भंते नागघोष महाथेरो, भंते धम्मानंद, भंते पंय्यारखित, भंते संचितबोधी आणि भंते मिलिंद उपस्थित होते. त्यांनी आंदोलनाची पार्श्वभूमी आणि उद्दिष्टे स्पष्ट करताना देशभरातील बौद्ध समाजाने एकजुटीने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.

भिक्खू संघाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, ज्या पवित्र स्थळी तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, त्या गया येथील महाबोधी महाविहाराची उभारणी चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी केली होती. हा महाविहार हजारो वर्षांच्या बौद्ध वारशाचे प्रतीक मानला जातो. तथापि, सध्या या विहाराचे व्यवस्थापन बौद्धेतर व्यक्तींच्या ताब्यात असल्याची बाब बौद्ध समाजात नाराजीची ठरली आहे.

बौद्ध अनुयायांच्या मते, इतक्या मोठ्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाशी निगडित असलेल्या महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध समुदायाच्या देखरेखीखाली असणे आवश्यक आहे. ही मागणी केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील बौद्ध बांधवांकडून सातत्याने होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

भगवान बुद्धांचा धम्म आणि वारसा जतन करणे ही आपली नैतिक जबाबदारी असल्याची भावना व्यक्त करत देशभरातील बौद्ध समाज शहर, जिल्हा आणि तालुका स्तरावर संघटित होऊन आंदोलन करत आहे. या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष, नेते, बौद्धेतर धर्मप्रतिनिधी तसेच विद्वान व्यक्तींचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही भिक्खू संघाच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले.

पुणे परिसरातील सर्व धम्मप्रेमी आणि न्यायप्रिय नागरिकांनी मोठ्या संख्येने या धरणे आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन ‘पुणे परिसरातील भिक्खू संघ’ या निमंत्रक संस्थेमार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *