पुणे : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाविद्यालयाच्या वाङ्मयमंडळाचा उद्घाटन समारंभ साहित्यिक वातावरणात आणि उत्साहात पार पडला.
महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. हेमलता राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध कवी बाळासाहेब रोहकले यांच्या हस्ते वाङ्मयमंडळाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. सचिन घोलप उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रा. दत्तात्रय आसवले यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी वाङ्मयमंडळाच्या उपक्रमांचे महत्त्व विशद करत मराठी भाषा व साहित्याच्या संवर्धनासाठी अशा कार्यक्रमांची गरज अधोरेखित केली. पाहुण्यांचा परिचय प्रा. कल्पना शेळके यांनी करून दिला.
उद्घाटक कवी बाळासाहेब रोहकले यांनी आपल्या भाषणात मराठी साहित्याची समृद्ध परंपरा, ऐतिहासिक महत्त्व व आधुनिक काळातील मराठी भाषेची जबाबदारी यावर सखोल भाष्य केले. मराठी साहित्य हे समाजजीवनाचा आरसा असल्याचे त्यांनी नमूद केले. यानंतर त्यांनी ‘बाप’, ‘स्त्री जन्माची कहाणी’, ‘प्रपंच’, ‘माझा गाव’, ‘तुझ्यासाठी काय पण’ या स्वरचित कवितांचे सादरीकरण करून श्रोत्यांची मने जिंकली. त्यांच्या प्रत्येक कवितेला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

अध्यक्षीय भाषणात डॉ. सचिन घोलप यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी वाचन, लेखन व सर्जनशील उपक्रमांतून मराठी भाषेचा गौरव वाढवावा, असे आवाहन केले. अशा साहित्यिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जया रक्टे यांनी केले. समारोपप्रसंगी प्रा. प्रियंका हाके यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी प्रा. रंजीत गिरी, प्रा. गणेश कुलकर्णी, प्रा. कल्पना शेळके, प्रा. शबाना शेख, प्रा. म्हतू खेमनर, प्रा. पोपट खेमनर, प्रा. आरजू शेख, प्रा. प्रियंका हाके, प्रा. सागर गोसावी, प्रा. दीपक मेंगाळ, प्रा. कविता उगले, प्रा. पल्लवी वाणी, प्रा. कल्याणी शिंदे, प्रा. अश्विनी वाणी, प्रा. मोहिते यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.