दत्तात्रय आसवले, प्रतिनिधी

पुणे : साकूर येथील रमेश फिरोदिया कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन तसेच पारंपारिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. पारंपरिक वेशभूषा स्पर्धेत एकूण १५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या वेशभूषेद्वारे मराठी संस्कृतीचे वैभव प्रभावीपणे सादर केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. दत्तात्रय आसवले यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यामागील हेतू स्पष्ट केला.

ग्रंथ प्रदर्शनात मराठी साहित्याच्या विविध शाखांतील निवडक व दर्जेदार पुस्तकांचे आकर्षक प्रदर्शन मांडण्यात आले होते. संत साहित्य, आधुनिक साहित्य, चरित्रग्रंथ, कादंबऱ्या, संशोधनपर ग्रंथ अशा विविध प्रकारच्या पुस्तकांनी विद्यार्थ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले. या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीबद्दलची आवड अधिक दृढ झाली.

पारंपरिक वेशभूषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आदिवासी, शेतकरी, वारकरी, कीर्तनकार, बहुरूपी अशा मराठी समाजजीवनाचे विविध पैलू उलगडणाऱ्या व्यक्तिरेखा साकारल्या. तसेच जिजाबाई, रमाबाई आंबेडकर आणि लक्ष्मीबाई यांसारख्या प्रेरणादायी ऐतिहासिक व सामाजिक व्यक्तिमत्त्वांची वेशभूषा सादर करून विद्यार्थ्यांनी मराठी संस्कृतीचा अभिमान व्यक्त केला. या सर्व सादरीकरणातून परंपरा, इतिहास आणि सामाजिक जाण यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. गणेश कुलकर्णी, प्रा. म्हतू खेमनर व प्रा. शबाना शेख यांनी काम पाहिले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे बारकाईने परीक्षण करून मार्गदर्शक अभिप्राय नोंदवला. वेशभूषेतील सर्जनशीलता, सादरीकरणाची शैली आणि सांस्कृतिक संदर्भ यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. हेमलता राठोड मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या मनोगतात मराठी भाषेचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक महत्त्व अधोरेखित केले. मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून संस्कृतीची ओळख आणि अस्मितेचा आधार आहे, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. सचिन घोलप , प्रा. रंजित गिरी, प्रा. कल्पना शेळके, प्रा. प्रियंका हाके तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे समारोप व आभार प्रदर्शन ग्रंथपाल कविता मोहिते यांनी केले. त्यांनी सर्व उपस्थित मान्यवर, परीक्षक, विद्यार्थी यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *