पुणे : उरुळी कांचन (ता. हवेली) : ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी शुक्रवारी (ता. १९) पार पडलेल्या निवडणुकीत मिलिंद तुळशीराम जगताप यांनी बाजी मारली. जगताप यांना ९ मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी प्रियांका ओंकार कांचन यांना ६ मतांवर समाधान मानावे लागले.

ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच ऋतुजा अजिंक्य कांचन यांनी राजीनामा दिल्यानंतर सरपंचपद रिक्त झाले होते. त्यानुसार नियमानुसार विशेष सभा बोलावून निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. या निवडणुकीत मिलिंद जगताप आणि प्रियांका कांचन यांचे प्रत्येकी एक अर्ज दाखल झाले होते. ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्यांपैकी १६ सदस्य उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राहावी, यासाठी गुप्त मतदान पद्धतीचा अवलंब करण्यात आला.

मंडल अधिकारी माधुरी बागुले यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. तलाठी प्रियंका सुंदरडे व ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे यांनी निवडणूक कामकाज पाहिले. मतदानात मिलिंद जगताप यांना ९, तर प्रियांका कांचन यांना ६ मते मिळाली. एक सदस्य गैरहजर असल्याने मतदान होऊ शकले नाही. बहुमताच्या आधारे निर्णय अधिकाऱ्यांनी मिलिंद जगताप यांची सरपंचपदी अधिकृत घोषणा केली.

दरम्यान, निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान दोन गटांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती चिघळू नये म्हणून उरुळी कांचन पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत दोन्ही गटांना शांत केले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. निवडणुकीदरम्यान तसेच त्यानंतर ग्रामपंचायत परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सरपंचपदी निवड झाल्यानंतर मिलिंद जगताप यांनी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्यांचे आभार मानले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते तसेच नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या निवडणुकीमुळे उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला असून, आगामी काळात ग्रामविकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *