पुणे : उरुळी कांचन येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुरस्कृत मोडी लिपी प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील मोडी लिपी तज्ज्ञ व अभ्यासक डॉ. राजेश बाराते, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अमोल बोत्रे, कला विभाग प्रमुख डॉ. समीर आबनावे, तसेच प्रा. राजेंद्र रूपनवर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. बोऱ्हाडे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात विद्यार्थ्यांनी पारंपरिक ज्ञानपरंपरेचा अभ्यास करून इतिहास संशोधनासाठी मोडी लिपी आत्मसात करण्याचे आवाहन केले. मोडी लिपी ही मराठा प्रशासनाची प्रमुख लेखनपद्धती असून ऐतिहासिक कागदपत्रांच्या अभ्यासासाठी तिचे ज्ञान अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. पारंपरिक ज्ञानपरंपरेच्या जतनासाठी अशा कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरतात, असेही त्यांनी सांगितले.

द्वितीय सत्रात डॉ. राजेश बाराते यांनी मोडी लिपीचे ऐतिहासिक, प्रशासकीय व सामाजिक महत्त्व स्पष्ट केले. मराठा कालखंडातील प्रशासन, अर्थकारण आणि सामाजिक व्यवहार समजून घेण्यासाठी मोडी लिपीचे ज्ञान आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. इतिहासातील अनेक मूळ कागदपत्रे आजही मोडी लिपीत उपलब्ध असून संशोधनासाठी विद्यार्थ्यांनी ही लिपी अवगत करणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

तृतीय सत्रात प्रा. बंडू उगाडे यांनी मोडी लिपीची लेखनशैली, अक्षररचना आणि वाचन तंत्र याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. अमोल बोत्रे यांनी कार्यशाळेचा उद्देश व विद्यार्थी विकास मंडळाची भूमिका स्पष्ट केली. सूत्रसंचालन प्रा. शुभांगी धुमाळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. स्वाती शिंदे यांनी केले.

या वेळी प्रा. अंजली शिंदे, प्रा. भाऊसाहेब तोरवे, प्रा. प्रियांका गोलांडे यांच्यासह कला विभागातील विद्यार्थी व इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहभागी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीने अल्पोपाहार देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *