पुणे : हवेली आणि दौंड तालुक्यातील मुळा मुठा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या जलपर्णी वनस्पतीमुळे मच्छरांची उत्पत्ती झपाट्याने वाढली असून नदीकाठच्या गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी

हिंगणगावचे माजी सरपंच अंकुश कोतवाल यांनी नागरिकांकडून केली आहे.

नदीपात्रात साचलेल्या पाण्यावर जलपर्णीची दाट चादर पसरली आहे. या वनस्पतीखाली स्थिर पाणी साचत असल्याने मच्छरांच्या अळ्यांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी संध्याकाळच्या सुमारास मच्छरांचे मोठे थवे गावांमध्ये, वाडी-वस्त्यांवर घोंघावताना दिसत आहेत. नागरिकांसह लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि जनावरे मच्छरांच्या चावण्याने त्रस्त झाली आहेत. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हवेली आणि दौंड तालुक्यातील अनेक गावांमध्ये परिस्थिती बिकट झाली असून रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही, अशी खंत व्यक्त होत आहे. जलपर्णी तातडीने काढून टाकणे, नदीपात्रातील पाण्याचा निचरा सुधारणे, तसेच मच्छरनाशक फवारणी नियमितपणे करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
“प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास गाव सोडण्याची वेळ येईल,” असा इशारा काही ग्रामस्थांनी दिला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रश्न असल्याने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने त्वरित पाहणी करून प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी एकमुखी मागणी होत आहे.