पुणे : संगीत ही केवळ मनोरंजनाची कला नसून मानवी जीवन समृद्ध करणारी कृतीशील शक्ती आहे. संगीतामुळे मन प्रसन्न राहते, तणाव कमी होतो आणि मानसिक शांतता लाभते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांनी येथे केले.
साने संगीत क्लासेसच्या वतीने आयोजित विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दैनिक ‘लोकमत’चे पत्रकार सहदेव खंडागळे यांनी भूषविले.

डॉ. भोळे म्हणाले, भारतीय संगीत अति प्राचीन व वैविध्यपूर्ण आहे. स्वर, ताल आणि लय यांच्या मिलापातून संगीत साकारते. शास्त्रीय, लोकसंगीत, सुगम आणि चित्रपट संगीत असे त्याचे विविध प्रकार आहेत. हिंदू धर्मातील चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे आणि ६४ कलांमध्ये संगीताला महत्त्वाचे स्थान आहे. अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातही संगीताचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.
संगीतामुळे गायन, वादन आणि नृत्याच्या माध्यमातून भावना जागृत होतात. शरीरातील पंचतत्त्वांचा समतोल राखण्यास मदत होते. सहस्रार, आज्ञा, विशुद्ध, अनाहत, मणिपूर, स्वाधिष्ठान आणि मूलाधार चक्रांवर संगीताचा सकारात्मक परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. मानसिक शांततेसाठी ‘म्युझिक थेरपी’ उपयुक्त ठरते, असेही ते म्हणाले.

महाभारतात इंद्राच्या आज्ञेनुसार अर्जुनाने गंधर्व चित्रसेन याच्याकडून संगीतकला शिकल्याचा उल्लेख आहे. श्रीकृष्णाची बासरी तसेच भगवान शंकराचे तांडव नृत्य ही संगीतकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. संगीत आत्मसात केल्यास भक्तिभाव वाढतो, समर्पणाची भावना निर्माण होते व चित्त एकाग्र होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे आयोजन शिवराज साने यांनी केले. प्रास्ताविक शिवराज साने यांनी केले, तर सूत्रसंचालन रोहिदास बिचकुले यांनी केले. आभार प्रदर्शन अमोल भोसले यांनी केले.
या प्रसंगी महा सुपरफास्ट न्यूजच्या संपादिका सुवर्णा कांचन, पुणे दख्खन संस्थेचे संस्थापक खलील शेख, दैनिक ‘केसरी’चे पत्रकार अमोल भोसले, पत्रकार बापू चौधरी, सुनील तुपे आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना गुणवंत पारितोषिके प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.