पुणे : संयम, विश्वास आणि अहंकाराचा नाश करणे म्हणजे नर्मदा परिक्रमा होय, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक व प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे यांनी केले. नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल तपस्वी श्री हरी प्रल्हाद बढे यांचा सन्मान सोहळा येथे वीरशैव लिंगायत सेवा मंडळात आयोजित करण्यात आला होता.

ऋषी मार्कंडेय यांनी हजारो वर्षांपूर्वी नर्मदा परिक्रमा केली असल्याचा उल्लेख करीत डॉ. भोळे म्हणाले, पायात चामड्याच्या वस्तू न वापरता, सात्विक आहार घेऊन आणि आत्मिक शक्ती जागृत ठेवत ही परिक्रमा केली जाते. नर्मदेच्या पवित्र उगमस्थान अमरकंटक पासून ते ओंकारेश्वर पर्यंत सुमारे ३६०० किलोमीटरचा प्रवास १०५ दिवसांत पूर्ण करणे ही मोठी तपश्चर्या आहे.

तपस्वी श्री हरी प्रल्हाद बढे व डॉ. हरी निवृत्ती पाटील यांनी जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या कालखंडात वेळ काढून ही परिक्रमा पूर्ण केली. ही परिक्रमा म्हणजे भक्ती, शक्ती आणि सहनशक्तीचे ऊर्जा स्तोत्र असून आत्मिक शांती, अंतरिक ऊर्जा व निष्काम सेवाभाव जागृत करणारी साधना आहे, असे डॉ. भोळे यांनी सांगितले.

भगवान श्रीकृष्ण यांनी भगवद्गीता या ग्रंथाच्या अठराव्या अध्यायात यज्ञ, दान, तप आणि कर्म यांचे महत्त्व सांगितले आहे. मात्र कलियुगात या गोष्टींसाठी वेळ नसतो; वेळ काढावा लागतो, असेही त्यांनी नमूद केले. मनुष्य नश्वर असून मोहमायेत अडकलेला असतो. त्यामुळे आत्मिक शांतीसाठी धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात वेळ देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात डॉ. भोळे यांच्या हस्ते श्री हरी प्रल्हाद बढे यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अण्णासाहेब पाटील, डॉ. हरी निवृत्ती पाटील, आदिशक्ती मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष अमोल पाटील, मुरलीधर खर्चे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन सौ. सविता हरी बढे व श्री अंकुर हरी बढे यांनी केले. सूत्रसंचालन सौ. अंकिता नारखेडे व सौ. स्नेहल बारदोषकर यांनी केले.

परिसरातील अनेक मान्यवर, भाविक व वारकरी संप्रदायातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *